मुंबई - करण जोहरच्या घरी झालेल्या बॉलिवूड सेलेब्रिटीजच्या पार्टीत तारे तारकांनी ड्रग सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर अभिनेता विक्की कौशलने पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे.
या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विक्की कौशल बराच सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. याबद्दल बोलताना विक्की म्हणाला, ''मला वाटते जे तुम्हाला वयैक्तीक ओळखत नाहीत ते लोक जे काही पाहतात त्यावरुन आपली मते बनवतात. असं आपणही काहीवेळा करतो. परंतु न समजून घेता समोरच्यावर काहीही बोलता ते योग्य नाही.''
विक्की पुढे म्हणतो, ''आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की, व्हिडिओ शूट होत आहे. करण व्हिडिओ बनवतोय हेही आम्हाला कळत होतं. इतकेच नाही तर व्हिडिओ बनवण्यापूर्वी ५ मिनीटे आधी करणची आई तिथे हजर होती. त्यानंतर हा व्हिडिओ रिलीज झाला. दुसऱ्या दिवशी मी अरुणाचल प्रदेशला निघून गेलो. तिथे मी सैनिकांसोबत राहिलो. तिथे नेटवर्क नसल्यामुळे मी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होतो.''
''चार दिवसानंतर मी जेव्हा परत आलो आणि ट्विटर चेक केले. मी काय विचार केला होता ? एफआईआर? ओपन लेटर...हे सर्व चाललंय काय ? मग मी घरच्यांना याबद्दल विचारले. ते म्हणाले तू कामात होतास त्यामुळे तुला आम्ही डिस्टर्ब केले नाही. होय, या गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला.''
विक्की पुढे सांगतो, ''काही दिवसापूर्वीच मला डेंग्यू झाला होता आणि त्यातून मी बरा होत होतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या लोकांना माझ्या तब्येतीबद्दल माहिती होते त्यांना विचारपूस केली. काहीवेळा स्टार असण्याची किंमत तुम्हाला चुकती करावी लागते. हा स्टार आहे म्हणजे याने असे केले असेल असा अंदाज लोक करायला लागतात.' असे सांगत या पार्टीत ड्रग सेवन कोणीही केले नव्हते असा खुलासा विक्कीने केलाय. त्या पार्टीत जे घडले त्याबद्दल सविस्तर घटना त्याने यावेळी सांगितल्या. विनाकारण बदनामीचा फटका त्याला बसल्याची खंतही त्याने बोलून दाखवली.
करण जोहरच्या पार्टीमध्ये विक्की कौशल याच्या शिवाय रणबीर कपूर, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, दीपिका पादुकोण आणि वरुण धवन उपस्थित होते.