मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आपला उमेद्वारी अर्ज दाखल केला. तिने आपली संपत्ती ६८.२८ कोटी असल्याचे घोषीत केले आहे. तिच्या संपत्तीच्या यादीत बँकेत जमा असलेली रक्कम, रोख, गाड्या आणि जमीनीसह गुंतवलेली संपत्ती याचा समावेश आहे. असे असले तरी तिच्या नावावर ३२ लाख रुपयांचे कर्जदेखील आहे. तिच्यावर कोणताही अपराधी गुन्हा दाखल नाही.
उर्मिलाचे शिक्षण किती आहे वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. तिने पदवी घेतलेली नाही. रुपारेल कॉलेजमध्ये ती शिकत होती. मात्र कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच तिने शिक्षण सोडून दिले होते. बॉलिवूडमध्ये ती सक्रिय झाल्यानंतर तिने पुढील शिक्षणाचा विचारच केलेला दिसत नाही.
मुंबईच्या सहा लोकसभा जागेंसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. उत्तर मुंबईतून उर्मिलाचा मुकाबला भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. हा मतदार संघ भाजपचा गड आहे. इथून सलग ५ वेळा राम नाईक विजयी झाले होते. मात्र गोविंदाने त्यांचा पराभव केला होता. गोपाळ शेट्टीही २०१४ च्या निवडणूकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले होते. सध्या तरी शेट्टींचे पारडे जड असले तरी उर्मिलाला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.