मुंबई - टीव्ही क्षेत्रात नेहमीच काही ना काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले जातात. असाच काहीसा वेगळा विषय घेऊन सोनी मराठी वाहिनीवर 'ह.म. बने तु.म. बने' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. समाजात समाजात घडणारे अनेक विषय योग्य प्रकारे हाताळून प्रेक्षकांना या मालिकेतून सामाजिक संदेश देण्यासाठी या मालिकेत वेगळ्या गोष्टी मांडल्या जातात. यावेळी असाच एक खास विषय घेऊन या मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. या भागांमध्ये खरा तृतीयपंथी कलावंत भूमिका साकारताना दिसणार आहे.
आजवर अनेक चित्रपटात आणि वेबसेरीजमध्ये तृतीयपंथी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. मात्र, टीव्ही मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच तृतीयपंथी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -नागराज यांचा 'झुंड' वादाच्या कचाट्यात, कॉपीराईटमुळे मिळाली नोटीस
तृतीयपंथी लोकांना समाजात नेहमीच एक अनोखा घटक म्हणून पाहिले जाते. मात्र, या मालिकेच्या माध्यमातून तृतीयपंथीय लोक प्रकाशझोतात येणार आहेत. तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमानस्पद अशी बाब ठरणार आहे .
हेही वाचा -सावित्रीबाई मालुसरेंच्या करारी भूमिकेत झळकणार काजोल
मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे. पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का? हे या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. त्यामुळे या भागाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.