मराठी चित्रपट आशयघन चित्रपटांसाठी जाणला जातो आणि त्यात दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नाव खूप वर आहे. नुकतेच या प्रतिभाशाली दिग्दर्शिकेचे निधन झाले. सुमित्रा भावे यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांसाठी चाकोरीबाहेरील विषय निवडले. त्यांचे दिग्दर्शन असलेला त्याचा शेवटचा सिनेमा ‘दिठी’ प्रदर्शनासाठी तयार होतोय आणि या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले.
सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिठी' या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहाराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळाली असून मराठी मनोरंजनसृष्टीत याबद्दल चर्चा आहे.
सुमित्रा भावे यांना ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ११ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४५ हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभूषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले आहे.
या चित्रपटात शशांक शेंडे, अमृता सुभाष, डॉ मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, ओंकार पटवर्धन, दिलीप प्रभावळकर आणि किशोर कदम यांच्या भूमिका आहेत. ‘दिठी’ हा सुमित्रा भावे लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट २१ मे रोजी होणार प्रदर्शित सोनी लिव्ह ओरिजिनल्स वर प्रकाशित होणार आहे.
हेही वाचा - गरजूंच्या मदतीला रस्त्यावर उतरला गायक मिका सिंग