मुंबई - दिवाळीपासून बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांना थोडे अच्छे दिन आले आहेत. याची सुरुवात 'हिरकणी' या सिनेमाद्वारे झाली. समोर 'हाऊसफुल्ल-4' सारखा तगडा सिनेमा असताना सुद्धा हिकरणी या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याच्याच पुढच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला झी स्टुडिओजच्या 'खारी बिस्कीट' या सिनेमालाही प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला आहे. आज 'हिकरणी' तिसऱ्या आठवड्यात आणि 'खारी बिस्कीट' दुसऱ्या आठवड्यात यशस्वीरित्या सुरू असतानाच बॉक्स ऑफिसवर तीन मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत.
आज प्रदर्शित झालेला पहिला मराठी सिनेमा आहे, 'कॉपी'... कॉपी या सिनेमाद्वारे राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉपी नक्की विद्यार्थ्यांना का करावीशी वाटते.. इथपासून ते शिक्षक नक्की ती का करू देतात.. इथपर्यंत सारं या सिनेमातून मांडण्यात आलेलं आहे. वेळेवर पगार न मिळणाऱ्या शिक्षकाची शिक्षण देताना कशी कुचंबणा होते. याचे चित्र या सिनेमातून मांडण्यात आले आहे. अभिनेता अंशुमन विचारे, मिलिंद शिंदे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. 2018 चा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कॉपी हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला होता.
आज रिलीज झालेला दुसरा मराठी सिनेमा आहे, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळालेला 'कोती' हा सिनेमा..हा सिनेमा राज्य सरकारकडून कान चित्रपट महोत्सवात पाठवण्यात आला होता. एका तृतीयपंथीयाच्या बालपणीची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली असून आपल्या भावाला समाज का झिडकारतो याबाबत त्याच्या भावाने दिलेला लढा या सिनेमाद्वारे मांडण्यात आला आहे. सुहास भोसले यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. आज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे, संजय कुलकर्णी, विनिता काळे, मोहिनीराज गटणे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
आज रिलीज झालेला तिसरा मराठी सिनेमा आहे 'बकाल', छायाचित्रकार समीर आठल्ये यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'बकाल' हा एक ऍक्शनपॅक सिनेमा आहे. विदर्भात समाजविघातक कारवाया करणाऱ्या बकाल नामक एका गॅंगचा सफाया एका समांतर सुरक्षा सेनेने केला होता. या सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे चैतन्य मिस्त्री हा नवोदित अभिनेता पदार्पण करतोय तर त्याच्यासोबत मटा श्रावण क्वीन बनलेली जुई बेंडखेळे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. चैतन्यने स्वतः केलेले जबरदस्त स्टंटस आणि अशोक पत्की यांनी पहिल्यादा संगीतबद्ध केलेलं आयटम सॉंग हे बकाल या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.
आता या सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात हे येत्या एक दोन दिवसात कळेलच..