बंगळुरू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून सिनेमागृहे बंद आहेत. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सिनेमा आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली असली, तरी सिनेमागृहे मात्र बंदच होती. मात्र, आता कर्नाटकातील सिनेप्रेमींना सिनेमागृहात जाण्याचा आनंद घेता येणार आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे खुली करण्यात येणार असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.
राज्यातील सिनेमागृहे खुली करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे राज्यातील सिनेमागृहे १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख डी. आर. कृष्णा यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साऊथ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि मल्टिप्लेक्स असोसिएशन यांच्यासोबत झूम बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये फिल्म चेंबरचे अध्यक्ष जय राजही उपस्थित होते. यावेळी शाहांनी सिनेमागृह मालकांच्या आणि सिनेसृष्टीतील इतर लोकांच्या अडचणी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पुढील महिन्यात सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली. सिनेमागृहे सुरू करण्याबाबतची नियमावली सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपण जाहीर करणार असल्याचेही शाहांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : सीमेपासून केवळ २०० मीटर अंतरावर सशस्त्र चिनी सैन्य; छायाचित्रे व्हायरल