पुणे - तनुश्री दत्ता प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लीन चिट देण्याच्या संदर्भात महिला आयोगाला काहीही बोलायचे नाही. मात्र, या प्रकरणात तनुश्री दत्ता एकदाही महिला आयोगाच्या समोर आपली बाजू मांडण्यासाठी आल्या नाहीत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
नाना पाटेकर यांच्या विरोधात मी टू प्रकरणात तनुश्री दत्ता यांनी आरोप केले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांना नुकतीच क्लीन चिट मिळाली आहे. त्यावर तनुश्री दत्ता यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना विचारले असता त्यांनी तनुश्री दत्ता कधीही महिला आयोगा समोर आपली बाजू मांडण्यासाठी आल्या नसल्याचं स्पष्ट केले.
तनुश्री दत्ता यांची केस तिऱ्हाईता मार्फत महिला आयोगाकडे आली होती. ही केस महिला आयोगाकडे कोणी आणून दिली याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. तरीदेखील महिला आयोगाने तातडीने या प्रकरणाची दखल घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून उत्तरही मिळाले होते. मात्र या प्रकरणात तनुश्री दत्ता यांच्याकडून महिला आयोगाला अधिक माहिती जाणून घ्यायची असताना तनुश्री दत्ता या एकदाही महिला आयोगाच्या समोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी आल्या नाहीत असे विजया रहाटकर यांनी सांगितले.