मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि चित्रपट निर्माती तसेच लेखिका असलेली ताहिरा कश्यप हिने आयुष्मानच्या आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातील भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मला आयुष्मानबद्दल फार अभिमान वाटतो. तो ज्याप्रकारचे चित्रपट साकारतो त्यामधून काही ना काही संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. हा चित्रपटही तसाच आहे. मला असं वाटतं, की प्रेम ही भावना साजरी करायला हवी. ज्यावेळी एखाद्या मुलाची मुलाबरोबर किंवा मुलीची मुलीबरोबर प्रेम असणाऱ्या कथांना स्वीकारले जाईल, तेव्हा देशाचा विकास होतोय, असे मला वाटेल. अशा चित्रपटात आयुष्मान भूमिका साकारतोय, याचा मला आनंद आहे, असे ताहिरा म्हणाली आहे.
मुंबईतील टाटा मेमोरीअल हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांचा मेळावा ठेवण्यात आला होता. यामध्ये ताहिराने सहभाग घेतला होता. दरम्यान तिने माध्यमांशी संवाद साधला.
मागच्या वर्षी ताहिराने ब्रेस्ट कॅन्सरला मोठ्या हिमतीने लढा दिला. यातून ती आता बरी झाली आहे. तिच्या या कॅन्सरच्या प्रवासात तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याबद्दलही तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.