मुंबई - प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ लिखित ‘पिगमॅलियन’ हे अप्रतिम नाटक जगभरात भाषांतरित झालेले आहे. मराठीत पु.लं. देशपांडे यांनी ते ‘ती फुलराणी’ म्हणून सादर केले. आतापर्यंत मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. आता ‘फुलराणी’ नावाचा चित्रपट बनत असून, यात अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसेल. नुकताच त्याचा या चित्रपटातील लूक प्रकाशित करण्यात आला.
'माय फेयर लेडी' चित्रपटावरून प्रेरित
‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर लवकरच साकारणार आहे. नटसम्राट, ‘What’s up लग्न’ हे दर्जेदार यशस्वी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ह्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी’ ही कलाकृती चित्रपटरूपात साकारत आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा मनमोहक सुगंध २०२२ ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.
कलाकार वादनाची तगडी फौज
‘प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख दिली. चौकटीपलीकडच्या भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. ‘फुलराणी’ चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशींनी मला ऐकवली, तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी लगेचच त्यांना होकार दिला’, अशी प्रतिक्रिया सुबोध भावेने व्यक्त केली आहे. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. फुलराणीची भूमिका कोण साकारणार आणि इतर कलाकार कोण आहेत हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - उषा मंगेशकरांनी लता दीदींना केली ‘लिटिल चॅम्प्स’चा एपिसोड पाहण्याची विनंती!