अमरावती - महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अमरावतीत एकूण ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रंगलेल्या या नाट्यस्पर्धेला अमरावतीकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी वैष्णवी महिला आणि आदिवासी विकास संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले यतीन माझीरे लिखित 'आता पास' या कौटुंबिक नाटकाने प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
![Aata paas play gets good response](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5357116_amt2.jpg)
५ डिसेंबरला 'कॉफिन' या नाटकाने या स्पर्धेला सुरुवात झाली. पु ल देशपांडे यांचे 'सुंदर मी होणार' हे नाटक भोपाळच्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाने १० डिसेंबरला सादर केले. या नाटकानेही अमरावतीकरांची वाहवा मिळवली. कलादर्पण बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने अशोक काळे लिखित 'वेटिंग फॉर' या नाटकाने प्रेक्षकांना थक्क करून सोडले. यामध्ये रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम मध्ये घडणाऱ्या घटना आणि त्याद्वारे एखाद्याच्या आयुष्याला कशाप्रकारे कलाटणी मिळते, हे पाहायला मिळाले.
![Aata paas play gets good response](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5357116_amt3.jpg)
हेही वाचा -तुमच्यात अभिनयाचा किडा वळवळतोय? तर तुमच्याचसाठी परत येतोय 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'
गुरुवारी सकाळी 'आता पास' हे नाटक सादर करण्यात आले. हर्षद ससाने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. दोन अंकी कौटुंबिक नाटकाद्वारे गणित विषयात सतत अनुत्तीर्ण होणाऱ्या मुलाला वडिलांकडून दिला जाणारा दंड आणि हसत खेळत कठीण असा गणित विषय सोपा कसा होऊ शकतो हे दाखवण्यात आले. तसेच कुटुंबातील आपुलकी आणि प्रेमाच्या भावनेची उकलही या नाटकातून करण्यात आली.
![Aata paas play gets good response](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5357116_amt.jpg)
नाटकातील कलावंत मुक्ता बहाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. 'आता पाच' या आमच्या नाटकाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या नाट्य स्पर्धेतील सर्वच नाटकं दर्जेदार असून १७ डिसेंबर पर्यंत असणाऱ्या नाट्यस्पर्धेला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद देत नाटकांचा आस्वाद घेण्याचे आव्हानही मुक्ता बहाळे यांनी केले.
हेही वाचा -सर्वसामान्य व्यक्तीचा असामान्य प्रवास 'लता भगवान करे' सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच