अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामूळे जर गावी जाता नाही आले, तर मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण ती मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रीगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.
ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर स्पृहा जोशी म्हणाली, " दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५व्या दिवशी त्यातून छान रोपटे तरारून येणार आहे. मला हि कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलंय कि आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून ही नवीन सुरवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची ही सगळ्यात सुंदर पद्धत आहे."
स्पृहा पूढे सांगते, “कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्या घरापासूनच होते. त्यामुळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशा पध्दतीने सुरू करण्याची आता गरज आहे. “