मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच 'बाहुबली' फेम प्रभाससोबत झळकणार आहे. 'साहो' चित्रपटात ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. अॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या या टीझरने चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता श्रद्धानेही एक व्हिडिओ शेअर करून आणखी उत्सुकता वाढवली आहे.
श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या वाढदिवशी म्हणजे ३ मार्चला या चित्रपटाचा दुसरा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती तिने या व्हिडिओद्वारे दिली आहे. यामध्ये श्रद्धा स्टंट करताना दिसत आहे.
प्रभासच्या वाढदिवशी 'साहो'ची दमदार झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मात्र, श्रद्धा कपूरची झलक यामध्ये दिसली नव्हती. या चित्रपटात प्रेक्षकांना या दोन्ही कलाकारांच्या अभिनयासोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या चित्रपटाचे बजेट ३०० कोटीपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाच्या करिअरमधला हा आत्तापर्यंतचा बिग बजेट चित्रपट आहे. 'डाय हार्ड' आणि 'ट्रान्सफॉर्मर' सारख्या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्टंटमन केनी बेटस यांना या चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सची जबाबदारी सोपवली आहे.
'साहो' चित्रपट तेलुगु, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रभाससोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर जॅकी श्रॉफ, मंदीरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकारही झळकणार आहे. सुझीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.