मुंबई- गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वच व्यवहार बंद होते, याचा सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे चित्रपट सृष्टीला. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे शुटिंग बंद ठेवावे लागले होते. तर अनेक चित्रपटाचे शुटिंग पूर्ण होऊन देखील चित्रपट प्रदर्शित करता आले नाहीत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक कलाकार आपले अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करताना दिसत आहेत. अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘जर्सी’ देखील गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे ठरल्या वेळेत चित्रीकरण न झाल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता या चित्रपटाची रिलीज डेट ठरली असून येत्या दिवाळीत ५ नोव्हेंबरला ‘जर्सी’ प्रदर्शित होणार आहे.
'जर्सी' तेलगू चित्रपटाचा रिमेक
या चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये सुरु असून, काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळतानाचे चित्रीकरण करताना शाहिद जखमी झाला होता, शाहिद जखमी झाल्याने चार ते पाच दिवस चित्रपटाचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू करण्यात आले. ‘जर्सी’ हा चित्रपट क्रिकेटवर आधारीत असून, जर्सी या तेलगू चित्रपटाचा हा रिमेक आहे. ‘कबीर सिंग’ च्या रिमेकने शाहिद कपूरला करियरमध्ये मोठा आधार दिला होता. आता हा येणारा चित्रपट त्याच्यासाठी कसा असेल हे बघावे लागणार आहे. गौतम टिन्नानुरी दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर, पंकज कपूर सुद्धा आहेत. चित्रपटाची प्रस्तुती अल्लू अरविंद यांची असून, अमन गिल, दिल राजू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.