मुंबई - तमिळ अभिनेता विजय सेतुपती श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या चरित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, यानंतर सुरू झालेल्या वादामुळे स्वत: मुरलीधरनने विजयला विनंती करून चित्रपट सोडण्यास सांगितले. त्यानुसार विजयने चित्रपट सोडल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले. मात्र, आता त्याच्या अल्पवयीन मुलीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
काल (सोमवारी) सायंकाळी विजयच्या मुलीला धमकी मिळाली. मुलीवर अत्याचार झाल्यानंतरच विजयला 'इलम तमीळ' लोकांचे दु:ख समजेल, असे या धमकीत म्हटले आहे. त्यानंतर हजारो नेटीझन्सनी या धमकी विरोधात संताप व्यक्त करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुजरातमधून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. सेलिब्रिटींच्या मुलींना वादात ओढत त्यांना अशा धमक्या मिळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच सोशल मीडियावरील तर्कवितर्कांवरून यावर चर्चा वाढत आहे.