मुंबई - लॉकडाऊननंतर बऱ्याच अडकलेल्या चित्रपटांना संजीवनी मिळाली असून आता चित्रपटगृहे उघडल्यानंतर चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा घोषित होऊ लागल्या आहेत. अनेक नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. 'नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर उत्सुकता वाढविणारे ठरले आहे.
'झिम्मा' नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती. मात्र जवळपास गेले संपूर्ण वर्ष क्रियाकलापाविना गेल्यामुळे त्याचे प्रदर्शन, इतर चित्रपटांप्रमाणेच, कधी होईल याचा अंदाज नव्हता. हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला. त्यामुळे आता या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळते याकडे प्रेक्षक डोळे लावून आहेत. त्यांनी लॉकडाऊन आधी एक पोस्टर अनावरीत केले होते. त्यावरून यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. परंतु आता सामाजिक चित्र स्पष्ट झाले असून ‘झिम्मा’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटातील कलाकारांची नावे उघड केली आहेत. चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत.
कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या ‘झिम्मा’ मध्ये सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे.
या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' च्या बॅनरखाली याची निर्मिती झाली असून क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अनलॉकनंतर प्रदर्शित होणारा पहिला मोठा मराठी सिनेमा समजला जाणारा ‘झिम्मा', येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - IPL प्रेमींसाठी आनंदाची बातमी, आयपीएल २०२१ ची तारीख ठरली