‘ज्युलियाज आईज’ हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट एकंदरीत चार भारतीय भाषांमध्ये बनतोय. तो मराठीत सुद्धा बनत आहे. त्याचे नामकरण ‘अदृश्य’ असे झाले असून बॉलिवूडमधील प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनीय पदार्पण करीत आहेत. कबीर लाल यांनी आज पर्यंत ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक इत्यादी अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे. ‘अदृश्य’ हा थ्रिलर चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, मंजिरी फडणीस असून आता त्यांना दृश्य रूपात भेटणार आहे रितेश देशमुख. तो एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून कबीर लालसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे.
रितेश पुढे म्हणाला, “२० वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे. त्यांचा दिग्दर्शनीय पदार्पण असलेल्या ‘अदृश्य’चा मी भाग आहे ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.”
विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख २० वर्षानंतर पुन्हा एकदा काम करत आहेत. रितेशचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’ चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल होते. या विषयी रितेश म्हणाला की, “मी चित्रपटसृष्टीत येण्यामागचे कारण म्हणजे कबीर लाल. मला कधी वाटलेही नव्हते की मी चित्रपटांत काम करेन. सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेट वर शूटिंग बघायला मी गेलो होतो त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली कदाचित त्यावेळी त्यांना असे वाटले असेल कि मला ऍक्टर बनायचे आहे. पुढे त्यांनी ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटासाठी माझे नाव सुचवले आणि त्यांच्यामुळेच माझ्या फिल्मी करिअरला सुरवात झाली.”
पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्या सह सौरभ गोखले, अजय कुमार सिंह, अनंत जोग हे अभिनेते या चित्रपटात आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे आणि लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे .
‘अदृश्य’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - राज कुंद्राने माझे फोटोज आणि व्हीडिओज बेकायदेशीररित्या वापरले - पूनम पांडे