मुंबई - अभिनेता रितेश देशमुखला महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलाराव देशमुख यांच्यावर चरित्रपट बनवण्याची इच्छा आहे. लोकांचे मनोरंजन होईल व वडिलांच्या जीवन यात्रेला योग्य न्याय देऊ शकेल अशा स्क्रिप्टची गरज असल्याचे रितेशने सांगितले.
रितेश म्हणाला, ''माणसाच्या चमत्कारिक यात्रेपैकी ही एक गोष्ट आहे. त्यांनी एक सरपंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि एका राज्याचे मुख्यमंत्री बनले. अनेकवेळा काही लोकांनी त्यांच्यावर स्क्रिप्ट लिहिली आणि मला विचारले. परंतु सिनेमा बनवणे इतके सोपे नाही.''
रितेश पुढे म्हणाला, ''जेव्हा एखादा विषय तुमच्या अतिशय जवळचा असतो तेव्हा तुम्ही निष्पक्षता विसरुन जाता. समजा मी त्यांच्यावर चित्रपट बनवला, तर लोक म्हणतील मी त्यांची केवळ चांगली बाजू दाखवली आणि त्यांच्या जीवनाची दुसरी बाजूच दाखवली नाही. जर कोणी दुसऱ्याने सिनेमा बनवला तर मी म्हणू शकतो, ते असे नव्हते, ते कधीच अशा प्रकारच्या गोष्टी करायचे नाहीत आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्याच नाहीत. म्हणून जेव्हा सिनेमा बनावायचा असतो तेव्हा नेहमीच त्या विषयासंबंधीच्या मतांमध्ये अंतर असू शकते.''
रितेश म्हणतो, ''जेव्हा तुम्ही एखाद्याच्या जीवनावर पुस्तक लिहिता तेव्हा ते ५००-६०० पानी असते. परंतु दोन तासाच्या सिनेमात त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य दाखवणे कठीण आहे. जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर बायोपिक कंटाळवाणा होऊ शकतो.''
कामाच्या पातळीवर बोलायचे झाले तर रितेश देशमुख 'मरजावां' या चित्रपटात शेवटचा झळकला होता. यात तारा सुतारिया आमि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका होत्या. तो आगामी 'बागी ३' मध्ये भूमिका साकारत आहे. आगामी शिवाजी महाराजांवर तीन भागात चित्रपट बनवण्याची घोषणा रितेशने केलीय. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहे. याचा पहिला भाग पुढील वर्षी रिलीज होईल.