मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे कॅन्सरवर मात करून लवकरच भारतात परतत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये आता पूर्णत: सुधारणा झाली असून बॉलिवूडमध्येही ते वापसी करत आहेत. त्यांचा आगामी 'झुटा कही का' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता जिमी शेरगील देखील झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
'झुटा कही का' हा चित्रपट एक विनोदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ऋषी कपूर आणि जिमी शेरगीलसोबत ओमकार कपूर, सनी सिंग, लिलेट दुबे आणि मनोज जोशी हे कलाकार देखील झळकणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीप कांग हे करत आहेत. हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. आता ऋषी कपूर यांची भारतात परतण्याचीदेखील चाहत्यांना आतुरता आहे.