मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ याचा 'स्टुडंट ऑफ द इयर २' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. आत्ताही त्याच्या हातात ३ चित्रपट आहेत. तो 'बागी ३' च्या शूटींगला जुलैमध्ये सुरुवात करेल आणि सिल्वेस्टर स्टॅलोनचा गाजलेल्या 'रॅम्बो' चित्रटाच्या रिमेकचे काम पुढील वर्षी जानेवारीत सुरू करणार आहे.
'रॅम्बो' रिमेकचे दिग्दर्शन सिध्दार्थ आनंद करणार आहेत. सध्या ते ह्रतिक आणि टायगर यांना घेऊन चित्रपट बनवीत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आघाडीच्या वर्तमानपत्राशी बोलताना सिध्दार्थ म्हणाले, ''आम्ही रॅम्बोची पूर्वतयारी सप्टेंबरपासून करणार आहोत. टायगरची तयारी तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करेल आणि आम्ही शूटींगला सुरुवात जानेवारीत करु. रेकीचे काम लवकरच सुरू होईल. आम्हा प्रदर्शनाची तारीख निश्चित केली असून हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित होईल.''
या चित्रपटाचे स्वरुप सांगताना सिध्दार्थ म्हणाले, '' 'रॅम्बो' हा चित्रपट प्रथमतः अॅक्शनसाठी ओळखला जातो, परंतु माझ्या चित्रपटामध्ये कथा प्रेक्षकांना भावणारी असेल, याची मी खात्री देतो. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीशी ही कथा जोडलेली असेल. अर्थात अॅक्शन तर असेलच पण स्टिव्हन स्पिलबर्गच्या म्हणण्यानुसार इमोशन शिवाय अॅक्शन पाहताना प्रेक्षक कंटाळतात. त्यामुळे इमोशनची जोड अॅक्शनला असेल.''
दरम्यान टायगर श्रॉफचा 'स्टुडंट ऑफ द इयर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही. पहिल्या दिवशी १२ कोटीचे ओपनिंग मिळाल्यानंतर आजपर्यंत ५७ कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमलाय.