मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हाच थरार पुन्हा रूपेरी पडद्यावर '८३' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची संपूर्ण टीम पुढच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या टीमचा उत्साह पाहायला मिळाला. अभिनेता रणवीर सिंग आणि त्याच्यासोबत इतर कलाकारांनी क्रिकेट टीमचे काळ्या रंगाचे कोट घातले होते. त्यांना घेऊन येणाऱ्या बसवर त्या वर्ल्डकपच्या छायाचित्रांचा संग्रहदेखील लावण्यात आला होता.
रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्याने त्यांच्या भूमिकेसाठी कपिल देव यांच्या घरी १० दिवस राहुन त्यांच्याकडुन प्रशिक्षण घेतले. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतल्याचे त्याने माध्यमाशी बोलताना सांगितले. तसेच, आता होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याने भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
'चक दे इंडिया'चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २०२० मध्ये १० एप्रिलला उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची रणवीर आणि कपिल देव यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.