मुंबई - 'वटवृक्षाच्या छायेखाली कोणतंही झाड उगवू शकत नाही', ही म्हण तोपर्यंतच खरी वाटते, जोपर्यंत कपूर घराण्याचा वारसा कोणाला माहित नसेल. हिंदी सिनेसृष्टीत वर्षानुवर्षापासून कपूर घराणे राज्य करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि कल्पकतेमुळे अभिनेते राज कपूर यांनी अनेक दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. हिंदी सिनेसृष्टीत ते 'शो मॅन' म्हणून ओळखले जातात. आज त्यांची जयंती आहे. पाहुयात त्यांचा थक्क करणारा प्रवास...
राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडूनच मिळाला. मात्र, वडिलांच्या छायेखाली न राहता त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटातील भव्यदिव्यता, संगीत आणि रोमान्सने त्यांनी मुर्तिमंत रूप स्थापन केले.
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज कपूर यांनी वयाच्या ११ व्या वर्षी क्लॅपर बॉय म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. बॉम्बे टॉकीज आणि पृथ्वी थिएटर यांची त्याकाळी प्रचंड लोकप्रियता होती. वर्षानुवर्षापासून चालत आलेला अभिनयाचा वारसा त्यांनी आपल्या अथक मेहनतीने जपला होता. तसेच, भविष्यातील दिग्दर्शक, निर्मात्यांपुढे आपले उदाहरण निर्माण केले.
पुढे पृथ्वीराज यांच्या सांगण्यावरून किदार शर्मा यांनी राज यांना आपले तिसरे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नेमले होते. किदार शर्मा यांनी राज यांच्यात लपलेला अभिनेता ओळखला होता. त्यांच्या अभिनयाची चाहुल लागताच त्यांनी राज कपूर यांनी सिनेसृष्टीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. 'नीलकमल' या चित्रपटात त्यांनी मधुबालासोबत राज कपूर यांची निवड केली होती. येथुनच सुरू झाला होता राज कपूर यांचा अखंड प्रवास.
एक अभिनेता म्हणून राज कपूर यांनी आपल्या देहबोलीतून, हावभावातून, गोड हास्यातून आणि विशेष म्हणजे आपल्या निळ्या डोळ्यांतून प्रेक्षकांवर छाप पाडली होती. पडद्यावर त्यांचं व्यक्तीमत्व अगदी खुलून दिसत असे. त्यामुळेच त्यांची दिवसेंदिवस क्रेझ पाहायला मिळत होती. 'तिसरी कसम', 'संगम', 'मेरा नाम जोकर' यांसारख्या चित्रपटातून त्यांच्यातील प्रतिभावंत अभिनेता पडद्यावर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सुरुवातीला राज हे रुपेरी पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हते. त्यांना चित्रपट तयार करण्यात रस होता. चित्रपटांसोबतच ते त्यातील संगीतावरही विशेष भर देत असत.
वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी स्वत:च्या आर. के. स्टूडिओची स्थापना केली. या स्टूडिओद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला विविधांगी विषय असलेले चित्रपट दिले. आर.के.च्या कुटुंबाची चौथी पिढी देखील अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. या स्टुडिओने त्यांच्या कुटुंबासाठी एक मजबूत पाया घातला होता. सिनेसृष्टीत दर शुक्रवारी कलाकारांचे नशीब बदलते. मात्र, राज कपूर असे होते, ज्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर वर्षानुवर्षे आपल्या चित्रपटातून कलाकारांचे नशीब बदलले.
राज कपूर यांनी त्याकाळीही पडद्यावर बोल्डनेस दाखवला. ग्लॅमर, बोल्डनेस आणि अभिनेत्रींचे सौंदर्य पडद्यावर दाखवण्याचे धाडस त्यांनी त्याकाळी केले. त्यांच्या 'आग', 'आवारा', 'श्री ४२०', 'जागते रहो', 'बुट पॉलिश' आणि 'जिस देश मे गंगा बेहती है' यांसारख्या चित्रपटातून याचा परिचय होतो.
आपल्या रोमॅन्टिक चित्रपटातूनही त्यांनी काहीतरी संदेश देता येईल, असाच प्रयत्न केला. त्यांच्या रोमँटिक चित्रपटांमध्ये सामाजिक चेतनाची खोली होती. के.ए. अब्बास यांनी राज कपूर यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी लेखन केले आहे. सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचतील अशा कथा त्यांनी मांडल्या. त्यामुळेच बरेच चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहेत. राज कपूर हे विविध कौशल्य अंगी असलेले व्यक्तीमत्व होते. आपल्या विविध कलागुणांचा त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये कल्पकतेने वापर केला.
त्याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे ते चित्रपटातील संगीतावरही लक्ष केंद्रीत करत असत. संगीताची आवड निर्माण होणारे व्हिज्युअल तयार करणे, त्यासाठी योग्य संगीतकारांची ते निवड करत असत. त्याकाळी चित्रपटातील गाण्यांमुळेही चित्रपट हिट होत असत. राज कपूर यांच्या चित्रपटातील संगीताचीही क्रेझ पाहिली जाते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील राज कपूर यांची प्रशंसा केली होती. एकमेव 'शो मॅन' अशी उपमा त्यांनी दिली होती. राज कपूर यांची नात रितू नंदा यांच्या पुस्तकातही लता दीदींनी सांगितलेल्या आठवणीचा उल्लेख आहे. राज कपूर कशाप्रकारे त्यांच्या चित्रपटातील गाण्यांसाठी मेहनत घ्यायचे, हे लतादीदींनी सांगितले आहे. 'आवारा' चित्रपटातील 'घर आया मोरा परदेसी' या गाण्याबाबत त्यांनी आठवण सांगितली आहे. राज कपूर यांनी हे गाणं अगदी तंतोतत चित्रपटात जुळावं यासाठी त्यांनी ते पूर्ण बदललं होतं. या गाण्यात त्यांनी आलाप टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. रात्री ३ वाजेपर्यंत ते या गाण्यावर काम करत होते.
राज कपूर यांचे पहिले प्रेम हे संगीत होते. लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गाण्यांना त्यांनी आपल्या चित्रपटात स्थान दिले. एक अभिनेता आणि चित्रपट निर्माते असुनही त्यांना चांगल्या संगीताची ताकद माहित होती. त्यांनी शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि रविंद्र जैन यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत मिळून त्यांनी सदाबहार गाणी हिंदी सिनेसृष्टीला दिली आहेत.
'मेरा नाम जोकर' या चित्रपटामुळे त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. तगडी स्टारकास्ट असुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. मात्र, तरीही राज कपूर यांनी हार न मानता आपल्या मुलाला सिनेसृष्टीत भरारी घेण्यास सांगितलं. पुढे 'बॉबी', 'प्रेमरोग' आणि 'राम तेरी गंगा मैली' यांसारख्या चित्रपटातून त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेतली.
राज यांचे वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या चित्रपटाप्रमाणेच होते. बऱ्याच चढउतारांचा सामना करून त्यांनी यशाची भरारी घेतली होती. ४ दशकं त्यांनी सिनेसृष्टीमध्ये आपले अमुल्य असे योगदान दिले. मात्र, पुढे त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे दिल्ली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, २ जून १९८८ साली त्यांनी आपल्या आठवणी जगाच्या पाठीवर कोरून अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अमुल्य योगदानाकरता सिनेसृष्टी नेहमीच त्यांची ऋणी राहील.