मुंबई - ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे जागतिक कॅन्सर दिनाच्या दिवशीच कॅन्सरमुळे निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील 'कमांडर' हरपल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
भाटकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की रमेश भाटकर एक अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. प्रामुख्याने छोट्या पडद्याच्या माध्यमातून ते घरा-घरात पोहोचले होते. त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमधील भूमिका गाजवल्या असल्या तरी विशेषतः पोलीस तपासाशी निगडीत टीव्ही मालिकांमुळे ते अधिक परिचित होते. 'हॅलो इन्स्पेक्टर', 'कमांडर', 'तिसरा डोळा', आदी मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
शिताफीने गुन्हेगारांना गजाआड करणाऱ्या निर्भीड, निडर पोलीस अधिकाऱ्याच्या त्यांच्या भूमिका पाहून एकेकाळी अनेकांना पोलीस दलात भरती होण्याची स्फुर्ती मिळत होती. रमेश भाटकरांचे निधन प्रत्येक चाहत्याच्या मनाला चटका लावणारे आहे. आठवणींच्या रूपात ते कायम प्रत्येकाच्या हृदयात राहतील, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.