मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा - जोनास लवकरच मोठ्या पडद्यावर एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अॅमेझॉन स्टुडिओच्या आगामी 'शीला' या चित्रपटात ती 'मां आनंद शीला' यांची भूमिका साकारणार आहे. बॅरी लेविंसन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
हॉलिवूड रिपोर्टनुसार, 'शीला' या चित्रपटात आलिया भट्टने 'मां आनंद शीला'ची भूमिका साकारावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, आता या चित्रपटासाठी प्रियांकाची वर्णी लागली आहे.
कोण आहे 'मां आनंद शीला'?
मां आनंद शीला नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी 'वाईल्ड वाईल्ड कंट्री'मुळे चर्चेत आल्या होत्या. त्या १९८१ ते १९८५ पर्यंत आध्यात्मिक गुरु रजनीश म्हणजे ओशो यांच्या सचिव होत्या. त्यांनी ओरेगॉनच्या वास्को काउंटीमध्ये रजनीशपुरम या आश्रमाची स्थापना केली होती.
पुढे त्यांच्यावर १९८४ साली रजनीश यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप झाला होता. या हल्ल्यानंतर त्या युरोपला गेल्या होत्या. त्यांनी या आरोपाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांना २० वर्ष कैदेची शिक्षा झाली होती. पुढे ३९ महिन्यानंतर त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली.
प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स आणि जेसन सोसनॉफ द्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. निक यारबोर या चित्रपटाची कथा लिहणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, प्रियांकाने यावर्षी नेटफ्लिक्सच्या 'द व्हाईट टायगर' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.