मुंबई- प्रियदर्शन जाधव उत्तम अभिनेता तर आहेच परंतु तो एक उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकही आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच आघाडींवर आघाडीवर असलेला प्रियदर्शन त्याच्या विनोदी टाईमिंग साठी ओळखला जातो. त्यामुळे दिग्दर्शन करताना तो आपल्या कलाकारांकरून उत्तम काम काढून घेतो. दोनेक वर्षांपूर्वी त्याने ‘मस्का’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर त्याने ‘चोरीचा मामला’ हा विनोदी-सस्पेन्स चित्रपट दिग्दर्शित केला होता ज्याला भरपूर यश मिळाले होते व त्याचा हिंदीतही रिमेक होतं आहे. आता तो ‘लव सुलभ’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत असून ठाणे येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
तगडी स्टारकास्ट
‘लव सुलभ’ या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झाले असून ठाण्याचे विद्यमान महापौर मा.श्री. नरेशजी म्हस्के आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.
कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात
‘लव सुलभ’ या चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. टीजर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हाताने भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते पण चित्रपटाच्या कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन विशाल गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.
यावर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस
देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी ‘लव सुलभ’ चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे.