ठाणे - डार्लिंग हा कोरोना काळानंतर महाराष्ट्रातील पहिला रिलीज होणारा मराठी सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी हा सिनेमा महाराष्ट्रभर आणि देशभरात रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षभरात अनेक बडे सिनेमे रिलीज झाले नाहीत, ते आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. २६ जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र महाराष्ट्रातल्या काही सिंगल स्क्रीन थिएटर अजूनही सुरू न झाल्यामुळे असा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डार्लिंग सिनेमा रिलीज करण्याची जबाबदारी आयनॉक्सने घेतली असून मराठी सिनेमांसाठी जास्तीत जास्त थिएटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही आयनॉक्सने दिली आहे. कोरोनाची भीती कायम असताना सर्व सिनेमागृहात डायजेशन सेफ्टी मेजर घेऊन सिनेमा रिलीज केले जातील. हे वर्ष सिनेमा इंडस्ट्रीसाठी खूप चांगले असेल अशी भावना यावेळी दिग्दर्शक समीर पाटील आणि अभिनेता प्रथमेश परब यांनी बोलून दाखवली.
उत्तरेकडील राज्यात अजूनही कोरोनाचे संकट असतानादेखील सिनेमागृह शंभर टक्के सुरू करण्याच्या मागणीला तेथील राज्य सरकारने अनुमती दिलेली आहे. महाराष्ट्रातदेखील राज्य सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल अशी आशा अभिनेता प्रथमेश परब याला आहे. यामुळेच मराठी सिनेमा आणि एकूणच सिनेमा इंडस्ट्रीला चांगले दिवस पुन्हा येतील अशी आशा देखील प्रथमेश परब यांनी व्यक्त केली.
मागील वर्षभरात अनेक बिग बजेट सिनेमे हे रिलीज झालेले नाहीत आणि आता जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना हे सर्व सिनेमे रिलीज होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक सिनेमागृह आणि प्रेक्षक वर्ग मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. हॉलीवूड, बॉलीवूड, मराठी सिनेमा या सर्व इंडस्ट्रीजमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती रिलीज होणारे सिनेमे मोठ्या प्रमाणात असले तरीदेखील प्रेक्षक वर्ग सिनेमागृहात येईल असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा - 'बच्चन पांडे'मध्ये अक्षयच्या विरोधात खलनायक साकारणार अभिमन्यू सिंह!!