भोपाळ - अॅसिड हल्ल्यावर आधारित 'छपाक' हा चित्रपट मध्ये प्रदेशमध्ये राजकीय मुद्दा बनला आहे. यामुळे राजकारणाची हवा तापली आहे. राज्य सरकारने 'छपाक' चित्रपटाला करमुक्त घोषित केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. इतकेच नाही तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने भोपाळमधील पहिला शो प्रेक्षकांना फुकट दाखवला. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'तान्हाजी' चित्रपटाची तिकीटे फुकट वाटली.
इंदूर या शहरातही असेच वातावरण आहे. दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्यावेळी हजर होती. याचा राग भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. 'छपाक'ला त्यांचा विरोध आहे. त्यातच सरकारने हा सिनेमा टॅक्स फ्री केल्यामुळे राजकारण तापले आहे.
काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने भोपाळमधील संगीत थिएटरमध्ये 'छपाक'च्या पहिल्या शोचे तिकीटे मोफत वाटली. या चित्रपटाला भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पातळीवर विरोध केला आहे.
भाजपचे माजी आमदार सुरेंद्र नाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली काही लोक थिएटरवर पोहोचले आणि त्यांनी 'तान्हाजी' पाहण्याची विनंती लोकांना केली. 'छपाक' हा चित्रपट देशाच्या गद्दारांचा चित्रपट असून 'तान्हाजी' हा देशभक्तांचा चित्रपट असल्याचे सुरेंद्र नाथ सिंग यांनी म्हटलंय.
भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच 'छपाक'चा पैसा कुठे जाणार यावरही प्रश्न उपस्थित केला.
भाजप नेत्यांनी दीपिका पदुकोणच्या विरोधात विधाने केली आहेत. गोपाल भार्गव यांनी म्हटलंय, ''हिरॉईनला तर मुंबईत बसून डान्स केला पाहिजे. ती जेएनयूमध्ये कशाला गेली होती, हे मला कळत नाही.''
काँग्रेस नेत्यांनी भार्गव यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि सरकारच्या भूमिकेचे कौतुक केले. भार्गव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अजय यादव यांनी केली आहे.
'छपाक' आणि 'तान्हाजी' हे दोन चित्रपट शुक्रवारी एकाच दिवशी रिलीज झाले. 'छपाक' हा सामाजिक विषय असलेला चित्रपट आहे. तर 'तान्हाजी' ऐतिहासिक विषयावरील चित्रपट आहे. राजकीय चढा ओढीत दोन्ही चित्रपट सध्या मध्य प्रदेशात चर्चेत आहेत.