मुंबई - भारतीय जनतेवर गारुड करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान नरेंद्र मोदींनी मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात त्यांच्या बालपणापासून तर राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी या प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी वादात अडकलेला हा चित्रपट पहिल्याच दिवशी तोंडघशी आपटला आहे. मोदी लाट पाहता या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळेल, असे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता नरेंद्र मोदी जरी जिंकले असले, तरी त्यांच्यावर आधारित चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी नाकारलं, असेच चित्र सध्या या आकडेवारीवरून पाहायला मिळते.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या २.८८ कोटींची कमाई केली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. आता आठवड्याअंती या चित्रपटाच्या कमाईत किती भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
या चित्रपटासोबतच अर्जुन कपूरचा इंडियाज मोस्ट वान्टेड हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला नाही. या चित्रपटानेही पहिल्या दिवशी २ कोटीची कमाई केली आहे.