मुंबई - लहान मुलांना खेळणी खूप प्रिय असतात. त्यातच कॉमिक्समधील हिरो अथवा बाहुल्यांमध्ये ‘बार्बी’ असेल तर त्यांची खळी अजूनच खुलते. 'स्पायडरमॅन', 'बॅटमॅन', 'सुपरमॅन', ‘ॲव्हेंजर्स' अशा विविध हॅालिवूडपटांमधील सुपरहिरोजनी जगभरातील रसिकांना केवळ भुरळच घातली नाही, तर हे सुपरहिरोज खेळण्यांच्या माध्यमातून थेट रसिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. लहान मुलांच्या भावविश्वात या सुपरहिरोजने खूप महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे, पण आपल्या इतिहासात दडलेले सुपरहिरोज आजवर कधीही अशा स्वरूपात घरोघरी पोहोचलेले नाहीत.
हॉलिवूडपटांमधले सुपरहिरोज काल्पनिक आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले मावळे हे खरे आहेत. हे शूरवीर मावळेच खरे सुपरहिरो होते आणि आहेत. आजच्या काळात या सर्व खऱ्याखुऱ्या सुपरहिरोजची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. 'पावनखिंड' या सिनेमाच्या निमित्तानं अशा प्रकारचा पहिला प्रयत्न करण्यात आला आहे, जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे.
'पावनखिंड' सुपरहिरो खेळणी
हे सुपरहिरो खेळणी रूपाने मुलांच्या भावविश्वात आणि त्या अनुषंगाने घरोघरी पोहाचवण्याचे अनोखे आणि अत्यंत प्रेरणादायी काम 'पावनखिंड' या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आलमंड्स क्रिएशन्स तर्फे करण्यात येत आहे. 'पावनखिंड'या चित्रपटात प्राणपणाने लढणारे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजीराव बांदल, श्रीमंत कोयाजीराव बांदल यांच्यासह बांदल सेनेतील काही निवडक शूरवीर मावळे आकर्षक खेळण्यांच्या रूपात लहान मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. लहान मुलांचा खेळही व्हावा आणि त्यांना शिवकालीन इतिहासाची माहितीही मिळावी असा दुहेरी हेतू यामागे आहे. पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्याचं काम त्यामुळं सोपं होणार आहे. खेळता-खेळता त्यांच्या मनावर इतिहासाची माहिती कोरली जाईल.
मोल्डिंगची आहेत खेळणी
मराठी सिनेमाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत. 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि अनिरुद्ध आरेकर या निर्मात्यांनी केलेला हा अनोखा प्रयत्न प्रादेशिक चित्रपटांमध्ये आणि त्यातही मराठीत प्रथमच होताना दिसत आहे. मोल्डींगची ही खेळणी अत्याधुनिक प्लॅस्टीक फॅारमॅटमध्ये आहेत. मजबूत, आकर्षक आणि टिकाऊ असलेली ही खेळणी आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुकानांसह सर्व मॅाल्समध्ये ही खेळणी पोहोचणार आहेत. 'पावनखिंड' प्रदर्शित होण्यापूर्वी ही बच्चे कंपनींपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाचे नियम व अटी खेळण्यांसोबतच देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Oscar Nominations 2022: सुर्याचा 'जय भीम' आणि मोहन लालचा 'मरक्कर' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर