मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू होऊन तीन महिने झाले तरी त्याबाबतची चर्चा थांबण्याची चिन्हे नाहीत. सुशांतबाबत दररोज नवनवीन मुद्दे बाहेर येत आहेत. निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही आता सुशांतबाबत काही गोष्टी समोर आणल्या आहेत. एका टीव्ही अभिनेत्यासोबत काम करायचे नाही असे कारण देत परिणीती चोप्राने 'हसी तो फसी' चित्रपटात सुशांतसोबत काम करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत अनुरागने ही गोष्ट उघड केली.
'हसी तो फसी' चित्रपटासाठी आम्हाला एका अभिनेत्रीची आवश्यकता होती म्हणून आम्ही परिणीतीला विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी तिला सुशांतसोबत काम करायचे नव्हते. 'काय पो छे', 'पीके' या चित्रपटांची उदाहरणे देऊन सुशांत फक्त टीव्ही अभिनेता नसल्याचे पटवून दिले. त्याचवेळी परिणीती यशराजचा 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटावर काम करत होती. हा सर्व प्रकार झाल्यानंतर अचानक सुशांतची वर्णी यशराजच्या त्याच चित्रपटात लागली. मला खात्री आहे, यामागे परिणीतीच असावी, असे अनुराग कश्यपने म्हटले आहे.
सुशांतचा 'एमएस धोनी:अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरपासून अनुराग सुशांतसोबत चित्रपट करू इच्छित होता. मात्र, धोनीच्या अभूतपूर्व यशानंतर सुशांतने अनुरागला प्रतिसाद दिला नाही, असेही त्याने सांगितले.