मुंबई - ७० व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. यानुसार आज भारतातील मानाच्या पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पद्मश्री पुरस्काराच्या यादीत ख्यातनाम पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या नावाचा समावेश आहे.
भारत सरकारच्यावतीने अद्याप पद्म पुरस्करांची नावे अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेली नाहीत. मात्र पद्मश्री पुरस्कार सुरेश वाडकरांना मिळावा अशी महाराष्ट्रातील अनेकांची होती. काही वर्षांपूर्वी वाडकर यांनीही आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. शरद पवार यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी बोलून दाखवले होते.
मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज संगीतकार आणि पार्श्वगायकांनी वाडकरांना पद्मश्री मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर २०२० च्या यादीत सुरेश वाडकरांचे नाव असल्यामुळे सर्वांनाच आनंद झालाय.
सुरेश वाडकर यांना २००७मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान झाला होता. मात्र त्यानंतर अद्यापही पद्मश्री मिळाली नव्हती. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.