पुणे - शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन केल्या प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे व एकाला आज पुण्यातील स्वारगेट येथून अटक करण्यात आली. शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अभिनेत्री मानसी नाईक यांनी मुंबई मधील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये रांजणगाव येथे गैरवर्तन झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार रांजणगाव पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एक पथक तयार करून यातील एका आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी डीजे कामगार अजय कल्याणकर याला पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतले आहे.
युवासेना जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन कार्यक्रमादरम्यान सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांच्याशी डीजे कामगार याने गैरवर्तन केले. त्यावेळी आयोजक डॉ. संतोष पोटे व त्यांच्या पत्नी यांचे अभिनेत्री मानसी नाईक यांच्यात वाद झाला. त्यानुसार मुंबई साकीनाका पोलिसांत तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर पथक तयार करुन डिजे कामगार याला अटक करण्यात आली असून शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला शिरुर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे
दरम्यान डॉ संतोष पोटे व त्यांच्या पत्नी यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला असून अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले.