मुंबई - मैत्रीचे नाते जगात सर्वात जवळचे नाते म्हणून समजले जाते. मैत्री साठी कुठलेही बंधन नसते. अगदी कुणाशीही, कधीही, कुठल्याही कारणाने या जगात मैत्री होऊ शकते. मात्र, या जगाबाहेरील कुणाबरोबर मैत्री झाली तर? चक्क भूतांशी मैत्री झाली तर? अगदी हाच विषय घेऊन एक नवीन मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘ओह माय घोस्ट’.
वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत. मोहसीन चावडा हे या चित्रपटाचे लेखक आणि संवादलेखक आहेत. अतिरिक्त संवाद लेखन निखिल लोहे यांचे आहे. हनीफ शेख यांनी ॲक्शन डिझाईन केली आहे. संगीत रोहित राऊत यांचे आहे आणि त्यांनी पार्श्वगायन सुद्धा केले आहे. कला दिग्दर्शन खुशबू कुमारी यांनी केले असून पार्श्वसंगीत सत्या, माणिक आणि अफसर यांनी दिले आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण मध्य-महाराष्ट्रात, औरंगाबाद, येथे संपन्न झाले.
‘ओह माय घोस्ट्’ हा विनोदी पठडीतील चित्रपट असून ही जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्याच्या जीवनात येते.
‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’ यांच्यासह निर्माते सना वसिम खान आणि रोहनदीप सिंग यांनी एकत्रितपणे ‘ओह माय घोस्ट्’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.