जेम्स बाँडचा बहुप्रतीक्षित नो टाईम टू डायचा प्रीमियर मंगळवारी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॅनियल क्रेग, ली सेडॉक्स आणि नो टाईम टू डायच्या कलाकारांसह ब्रिटनचे राजघराण्यातील सदस्य रेड कार्पेटवर सामील झाले. कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.
ब्रिटनचे राजघराणे नो टाईम टू डायच्या रेड कार्पेटवर
प्रिन्स चार्ल्स, त्याची पत्नी कॅमिला, प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट द डचेस ऑफ केंब्रिज प्रीमिअरमध्ये उपस्थित असल्याचे दुर्मिळ दृष्य पाहायला मिळाले. केट द डचेस ऑफ केंब्रिज यांनी सोनेरी केप ड्रेस परिधान करुन संपू्र्ण शोचे लक्ष वेधून घेतले होते.
रामी मलेक, लॅशा लिंच आणि नाओमी हॅरिसची उपस्थिती
खलनायक सफिन म्हणून जेम्स बाँड फ्रँचायझीमध्ये सामील झालेला अभिनेता रामी मलेक याने राजघराण्यातील सदस्यांची भेट घेतली. त्याच्यासोबत पहिल्या ब्लॅक महिला एजंट नोमीची भूमिका साकारणारी लॅशा लिंच आणि मनीपेनी म्हणून परतलेली नाओमी हॅरिस उपस्थित होते. ऑस्कर विजेता अभिनेता रामी मलेक हा विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. यांशिवाय, दाली बेनसाला आणि लॅशा लिंच या कलाकारांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
डॅनियल क्रेगचा अखेरचा चित्रपट
दीर्घकाळ चालणाऱ्या जेम्स बाँड मालिकेतील 25 वा चित्रपट असलेला नो टाईम टू डाय हा चित्रपट अभिनेता डॅनियल क्रेगचा अखेरचा चित्रपट असेल. हा चित्रपट सुरुवातीला एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे याचे जगभर प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. मंगळवारी याचा प्रीमियर पार पडल्यानंतर याच्या जगभर प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
डॅनियलने २००६ साली 'कसिनो रॉयल' मधून 'जेम्स बॉन्ड'च्या सीरिजमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल' आणि 'स्पेक्ट्रम' यामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 'स्कायफॉल' या सीरिजने ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले होते.
आता 'नो टाइम टू डाय' या चित्रपटातून पुन्हा एकदा डॅनियल जेम्स बॉन्डच्या रुपात दिसणार आहे. कॅरी फुकुनागा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जेम्स बॉन्डसोबतच बॉन्ड गर्ल्सचीही चर्चा पाहायला मिळते. 'नो टाइम टू डाय' मध्ये अना दे अमर्स ही बॉन्ड गर्ल बनणार आहे.
हेही वाचा - पठाण : शाहरुख, दीपिका स्पेनमध्ये प्रेक्षणीय स्थळावर करणार गाण्याचे शुटिंग