कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात जागतिक मनोरंजनसृष्टी संपूर्णतः बंद होती. कोविड परिस्थिती थोडीफार कंट्रोलमध्ये आल्यावर शुटिंग्स वगैरे सुरु करण्यात आली, अर्थातच कोविड प्रोटोकॉल सांभाळून. काही हिंदी मराठी चित्रपट लंडन मध्ये शूटिंग करून आले. अनेक चित्रपटांची चित्रीकरणं युरोप मध्ये झाली. यूरोपातील स्पेन मध्ये त्यांच्या भाषेतील ‘नुएवा नॉर्मलीदाद’ चे शुटिंगही त्याच सुमारास सुरु झाले. हे सांगण्याचं कारण म्हणजे त्या स्पॅनिश चित्रपटामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीने महत्वपूर्ण भूमिका केलीय. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री उषा जाधव ने ( National Award winning actress Usha Jadhav ) त्या चित्रपट काम केलंय.

‘धग’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री उषा जाधव ने ‘नुएवा नॉर्मलीदाद’ या स्पॅनिश चित्रपटात काम केलंय. तसेच ५०व्या इंडियन इंटरनॅशल फिल्म फेस्टिवल मध्ये अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नं १०३/२०१५’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच याच चित्रपटासाठी उषा ला एनवायसी साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, न्यूयॉर्क आणि इंडो जर्मन फिल्म वीक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, बर्लिन येथेदेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साठी पुरस्कार मिळाले होते.

साधारण दोनेक वर्षांच्या गॅप नंतर स्पेन मध्ये गोया अवॉर्ड्स २०२२ चे आयोजन करण्यात आले होते जे स्पॅनिश फिल्म अकादमीने आयोजित केले होते. यात स्पॅनिश चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड्स बहाल केले जातात. हा पुरस्कार सोहळा अतिशय मानाचा समजला जातो. या नामांकित सोहळ्याला अभिनेत्री उषा जाधव ने नुकतीच हजेरी लावली. तिची भूमिका असलेला ‘नुएवा नॉर्मलीदाद’ दिग्दर्शित केला आहे प्रसिद्ध स्पॅनिश दिग्दर्शक अलेआन्द्रो कोर्टेस याने. उषा जाधव हिने या पुरस्कार सोहळ्याला त्याच्यासोबत हजेरी लावली होती आणि त्यावेळी तिने इंटरनॅशनल डिझायनर एमिलियो सॅलिनासचा हिने डिझाईन केलेला गाउन परिधान केला होता ज्यात ती आकर्षक दिसत होती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव ‘नुएवा नॉर्मलीदाद’ सारख्या विदेशी चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे याचा मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच अभिमान असेल.
हेही वाचा - सुझान खानने केले हृतिक रोशनची कथित प्रेमिका सबा आझादचे कौतुक