मुंबई - दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आगामी 'रामयुग' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या संगीतासाठी संगीतक्षेत्रातील महारथी एकत्र आले आहेत.
पंडीत हरीप्रसाद चौरसिया, पंडीत शीव कुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसैन, संगीत कंपोजर राहुल शर्मा हे सर्व एकत्र येऊन या चित्रपटाचे संगीत तयार करणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहीती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
'रामयुग' चित्रपटाच्या कथेवर कमलेश पांडे हे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'तेजाब', 'चालबाज', 'रंग दे बसंती', अशा चित्रपटांची कथा लिहिली आहे. 'रामायणावर आधारित कथेची मी बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत होतो. रामायणाची कथा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या कथेवर काम करणे आव्हानात्मक आहे', असे त्यांनी सांगितले आहे.
कुणाल कोहलींनी यापूर्वी 'फना', 'हम तुम' आणि 'मुझसे दोस्ती करोगे', यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता 'रामयुग'च्या निमित्ताने ते पुन्हा दिग्दर्शनीय धुरा सांभाळणार आहेत.