मुंबई - केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची आज (१६ जुलै) घोषणा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि राजीव नाईक यांना हे पुरस्कार जाहिर झाले आहेत.
सुगम संगीत क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी सुरेश वाडकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. तर ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांना नाट्य क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना नाट्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सुरेश वाडकर यांनी आपल्या सुंदर आवाजाच्या जोरावर आजवर अनेक हिंदी आणि मराठी सिनेमा, अलबम यासाठी गायन केलं आहे. याशिवाय 'अजीवसन' या संगीत प्रशिक्षण संस्थे तर्फे गेली कित्येक वर्ष त्यांनी संगीत शिकवून अनेक गायक तयार केलेत. उत्तरायण या सिनेमातील गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर, अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आले आहे.
राजीव नाईक यांनी त्यांच्या समर्थ लेखणीच्या बळावर अनेक प्रोयोगिक आणि व्यावसायिक नाटक मराठी रंगभूमीला दिली.
सुहास जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात समांतर रंगभूमीवरन केली. त्यानंतर बॅरिस्टर, आई रिटायर्ड होतेय यासारख्या अनेक व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केलं. तर 'तू तिथे मी', 'सातच्या आत घरात', 'बालगंधर्व', अशा अनेक सिनेमामध्ये त्यानी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील 'प्रपंच', 'कुंकू', 'अग्निहोत्र', अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही त्यानी काम केलंय.
या तिघांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याने सार्थ व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने पुरस्काराचा मान वाढल्याची भावना संगीत आणि नाट्य क्षेत्रातून व्यक्त होतेय.