मुंबई - आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी 'सिनिअर सिटीझन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांचे काही अॅक्शन सीन्सही आहेत. त्यामुळे त्यांच्या रफ अँड टफ लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते.
मोहन जोशी यांनी 'सिनियर सिटीझन' चित्रपटात 'अभय देशपांडे' हे पात्र साकारत आहेत. मुळात त्यांच्या भारदस्त आणि करारी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासाठी ही भूमिका साकारणे तितके आव्हानात्मक नव्हते. मात्र, 'रफ अँड टफ' व्यक्तिमत्व साकारताना त्यांनी थोडी मेहनत घेतली आहे. ही भूमिका नैसर्गिक वाटावी, म्हणून त्यांनी जिममध्ये जाऊन व्यायाम केला, बॉक्सिंगचे धडे घेतले. तसेच, त्यांच्या डाएटमध्येही बदल केला. देहबोली, बोलण्या-चालण्यातील रुबाबरदारपणा, स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विशेष लक्ष दिले.
हेही वाचा -'डंके की चोटपर बजेगा नारा', 'तान्हाजी'चं 'शंकरा रे शंकरा' गाणं प्रदर्शित
आपल्या या मेहनतीविषयी मोहन जोशी म्हणतात,'एखादा लष्कर अधिकारी निवृत्त झाल्यानंतरही त्याची लष्करातील जीवनशैलीच जगत असतो. खरंतर ही शिस्त त्याच्या नसानसातच भिनलेली असते. त्यामुळे हा निडरपणा माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला. जी भूमिका मी स्वीकारतो, त्या भूमिकेचा मी अभ्यास करतो. या भूमिकेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत, ते मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. कारण एक कलाकार म्हणून ते खूप गरजेचे आहे. त्यामुळे अभय देशपांडे साकारताना मी स्वास्थ्याकडे जास्त लक्ष दिले.
ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. या चित्रपटात मला बुलेट चालवायची होती आणि बुलेट चालवणे, माझी पॅशन आहे. त्यामुळे मी खूप खुश होतो. याच खुशीत एकदा एक सीन सुरु असताना, मी बुलेट घेऊन सुसाट सुटलो. काही अंतर गेल्यावर माझ्या लक्षात आले, की इतक्या वेगाने ती मला चालवायची नव्हती. मग परत रिटेक घेतला'.
हेही वाचा -अधिकृत घोषणा: क्रिकेटर मिताली राजचा येणार बायोपिक, तापसी पन्नू साकारणार भूमिका
या चित्रपटात मोहन जोशी यांच्या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित 'सिनियर सिटीझन' या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पाहिले आहे तर प्रमोद सुरेश मोहिते चित्रपटाचे एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर आहेत. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट