मुंबई - 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर कोणताही हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आयोगाच्या समितीने चित्रपट पाहून याचे रिलीज लोकसभा निवडणूकीनंतर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाला कळविले होते.
लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात पार पडणार असून याची सुरूवात ११ एप्रिल रोजी झाली होती. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान झाले असून अखेरचा टप्पा १९ मेला पार पडेल आणि २३ मेला मतमोजनी होईल. मोदी बायोपिकचा फायदा विशिष्ठ पक्षालाच होऊ शकतो हा विचार करुन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ५ एप्रिलला रिलीज होणार होता. नंतर याची तारीख बदलून ११ एप्रिल करण्यात आली. दरम्यान न्यायालयात विरोधकांनी धाव घेतली आणि याचे रिलीज खोळंबले.
ज्या हेतूने हा सिनेमा बनवण्यात आला होता त्याचा सपशेल हेतू फसल्याचे स्पष्ट झालंय. निवडणुकीनंतर या चित्रपटाचे रिलीज कसे होणार आणि त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी निवडणूकीत फायदा होणार नाही, याची खंत मात्र मोदी समर्थकांना राहील.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या बायोपिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ओबेरॉय साकारत आहे. झरीना वहाब, बरखा बिस्त सेनगुप्ता यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.