मुंबई - समाज सुशिक्षित असेल तर देश प्रगतिशील असतो आणि यासाठी प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु आपल्या देशामध्ये आंतरिक भागातील जनतेला अशिक्षित ठेवण्यात सर्वात मोठा हात राजकीय इच्छेचा आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी अनेकजण भ्रष्टाचार करत शिक्षणासाठी मिळणारी शासकीय रसद खिशात घालतात. त्यामुळे इच्छा असूनही वर्षानुवर्षे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. याच विषयावर आधारित ‘मास्साब’ हा चित्रपट आहे. ज्यातून देशातील गावोगावी प्राथमिक शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या कटू गोष्टीचा उहापोह करण्यात आला आहे. चित्रपटाचे नाव विचित्र वाटतं पण खरंतर 'मास्तर साब’ याचं ते अपभ्रंशीत रूप आहे. मास्टर जी किंवा मास्टर साब जलद रीतीने बोलताना घडलेला तो अपभ्रंश आहे.
आपल्या देशामध्ये देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, देश बदलला पाहिजे, सिस्टिम सुधारली पाहिजे अशा गोष्टी बोलणारे अनेक सापडतील. परंतु ते करण्यासाठी स्वतः काही करणारे विरळाच. अशाच हटके मनोवृत्तीचा एक युवक सुधीर कुमार (शिवा सूर्यवंशी) आपले आयुष्य शिक्षणाला, खासकरून प्राथमिक शिक्षणाला, वाहून देत गावोगावी फिरत असतो. मिळालेल्या आयएएसची नोकरीला न भुलता, आपल्या शिकविण्याच्या ‘पॅशन’ ला तो निवडतो.
शासकीय नोकरीत असणारा तो एका बालसुधागृहातील मुलांना शिक्षणाची गोडी लावून उत्तर भारतातील एका लहानश्या गावातील शाळेत रुजू होतो. तिथे गेल्यावर कळते की तिथे सगळीच बजबजपुरी आहे. शासनाकडून मिळालेली घरं जशी परस्पर भाड्याने दिली जातात तशाच शासकीय नोकऱ्याही दिल्या गेल्या आहेत हे सुधीर कुमारला दिसून येते. ज्यांना शिक्षकाचा पगार मिळत असतो त्याच्या जागी दुसराच कोणीतरी, मस्टर वरील शिक्षकाने ‘नेमलेला’ शिकवण्यासाठी शाळेत येत असतो. तसेच ‘मिड डे मिल’ च्या नावाखाली पण अनागोंदी असते. शिक्षकांना लज्जतदार परंतु विद्यार्थ्यांना बेचव जेवण आणि हे सर्व सर्वांना, मुख्याध्यापकांनाही, माहीत असते. परंतु सुधीर या सर्व गोष्टींशी लढा द्यायचं ठरवतो, आक्रस्ताळेपणा न करता. तो विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिकवत त्यांच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करतो. अर्थातच यामुळे त्याच्याविरोधात अनेकजण उभे राहतात परंतु सत्याची कास धरत तो प्रत्येक संकटाचा मुकाबला करतो. परंतु त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर होऊन देत नाही. गावात त्याला सोबत मिळते उषाची (शीतल सिंह) जी त्या गावची ग्राम प्रधान असते. तिलाही शिक्षणाची आवड असते व अख्या गावात सर्वात जास्त शिकलेली तीच असते. उषा आणि सुधीर एकमेकांवर अव्यक्त प्रेम करत असतात परंतु मुलांचे शिक्षण त्यांना त्यांच्या प्रेमापेक्षा महत्त्वाचे वाटत असते म्हणून ते शाळेच्या मुलांच्या भवितव्याबाबत सतत जागरूक असतात. एके दिवशी मुलांच्या दुपारच्या जेवणात विषबाधा होते व त्यासाठी सुधीर कुमारला दोषी ठरविले जाते. अंतर्गत चौकशीला त्याला सामोरे जावे लागते. पुढे काय होते? असत्याचा विजय होतो की शिक्षणाचा? सुधीर उषा यांच्या अव्यक्त प्रेमाचे काय होते? आदी प्रश्नांची उत्तरे मास्साब चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
हेही वाचा - आता अजय देवगण दिग्दर्शित ‘मे-डे’ साठी बोमन इराणी करारबद्ध!
शिक्षण केंद्रित बरेच चित्रपट येऊन गेलेत. आरक्षण, पाठशाला, सुपर ३० अशा चित्रपटांतून शिक्षणक्षेत्रातील अनेक समस्यांवर भाष्य करण्यात आले. हा चित्रपटही त्याच पठडीतील आहे.