मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प असलेली चित्रपट सृष्टी हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मनोरंजनसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून 'फ्री हिट दणका' या नवीन सिनेमाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली आहे.
एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने या सिनेमाची निर्मिती केली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टी फुलत असताना अनेक नवनवीन प्रयोगांसोबतच नवीन विषयावर चित्रपट येताना दिसत आहे. 'फ्री हिट दणका' हा सुद्धा एक भन्नाट विषय घेऊन येत आहे, असं निदान या चित्रपटाचं टिझर पोस्टर पाहून तरी आपल्याला दिसतंय.
या सिनेमाचं दिग्दर्शन सुनिल मगरे करणार असून, संजय नवगिरे यांनी या सिनेमाचे संवाद, पटकथा आणि गीत लिहिणार आहेत. या सिनेमाची कथा ही मैत्री, प्रेम यांची सांगड घालणारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर लगेचच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमात नक्की कोण कलाकार दिसणार याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. या सिनेमाची निर्मिती उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव यांनी केली असून सुधाकर लोखंडे हे या सिनेमाचे सह-निर्माते आहेत. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून त्याचं छायाचित्रण वीरधवल पाटील हे करणार आहेत.