मुंबई - 'नवरात्री'च्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ 'डॅडी' यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा, हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. मात्र, 'डॅडी'च्या हुबेहुब वेशात होते ते अभिनेते मकरंद देशपांडे.
होय, अभिनेते मकरंद देशपांडे यांनी 'दगडी चाळ' या चित्रपटात डॅडीं'चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून खुद्द 'डॅडी' असल्याचाच भास सर्वांना झाला. दगडी चाळीत जाण्याचं खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती केली. तसेच, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.
हेही वाचा -पाहा, 'करण अर्जुन'मधील 'भांगडा पाले' या गाण्याचे रिक्रिएशन
'दगडी चाळ २' या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून शूटिंग सुरू झाले आहे. 'दगडी चाळ २' मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. तर, या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे.
हेही वाचा - मराठी सिनेमा 'वेल डन बेबी'चे शूटींग होणार लंडनमध्ये!