मुंबई - कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या कपलच्या कथेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने ८.०१ कोटींची कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखीच वाढ झाली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीचे कमाईचे आकडे शेअर केले आहेत. दुसऱ्या दिवशी शनिवारच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनला झाला असल्याचे या आकड्यावरून लक्षात येत आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.०८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने १८.०९ कोटींचा गल्ला जमावला आहे.
'लुका छुपी' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती विजन यांनी केली आहे. एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.