मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांत दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'अ मान्सुन डेट', असे या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'ईरॉस नाऊ' या डिजीटल प्लॅटफॉर्मवर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.
'अ मान्सुन डेट' या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा हे करत आहेत. गजल दहिवाल यांनी या शॉर्ट फिल्मची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे कथानक समलैंगिक विषयावर आधारित आहे.
समलैंगिक विषयावर आत्तापर्यत बरेचसे चित्रपट बॉलिवडमध्ये तयार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूरच्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटातही हाच विषय हाताळण्यात आला होता. आता 'अ मान्सुन डेट' या शॉर्ट फिल्ममधुनही याच विषयाची मांडणी करण्यात आली आहे.
दक्षिण अमेरिकेचा सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल मानल्या जाणाऱ्या साऊथ एशिअन फिल्म फेस्टिव्हलमध्येही ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली आहे. यामध्ये कोंकणा सेन शर्मासोबत रघुवीर यादव याने भूमिका साकारली आहे. ५ जून पासून ही शॉर्ट फिल्म 'ईरॉस नाऊ'वर पाहता येईल.