मुंबई - बॉलिवूडचे महान गायक किशोर कुमार यांचा आज (४ ऑगस्ट) जन्मदिवस आहे. आपल्या आवाजाने लाखो करोडो चाहत्यांवर त्यांनी वर्षानुवर्षे राज्य केले. आजही त्यांच्या गाण्यांची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. ४ ऑगस्ट १९२९ रोजी त्यांचा मध्यप्रदेश येथील खंडवामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आयुष्यातील एका घटनेवरच अमिताभ बच्चन आणि जया यांचा 'अभिमान' हा चित्रपट आधारित होता. जाणून घेऊयात काय होता हा किस्सा...
अमिताभ बच्चन आणि जया यांचा 'अभिमान' हा चित्रपट त्याकाळी फार गाजला होता. २७ जुलै १९७३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ३ जुन १९७३ सालीच दोघेही लग्नबंधनात अडकले होते. मात्र, या चित्रपटाची कथा किशोर दा यांच्या आयुष्याशी निगडीत होती.
'अभिमान' या चित्रपटात किशोर कुमार आणि त्यांची पहिली पत्नी रोमा गुहा यांची कथा दाखवण्यात आली, अशी त्यावेळी चर्चा झाली होती. रोमा यांना गायिका बनायचे होते. मात्र, किशोर कुमार यांनी त्यांना घराकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यांचे हे लग्न फार दिवस टिकले नाही. पुढे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे ते वेगळे झाल्यानंतर किशोर कुमार हे मधुबालाच्या प्रेमात पडले.
अमिताभ बच्चन आणि जया यांच्या 'अभिमान'मध्ये हीच कथा दाखवण्यात आली. मात्र, या चित्रपटात शेवटी दोघेही एकत्र येतात. या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचे नाव सुरुवातीला 'राग-रागिनी' असे ठेवले होते. मात्र, चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून या चित्रपटाचे नाव 'अभिमान' असे ठेवण्यात आले. हा चित्रपट भारतासोबतच श्रीलंकेतही हिट झाला होता.