मुंबई - सारागढीच्या लढाईवर आधारित 'केसरी' चित्रपट गुरूवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात प्रदर्शित झालेल्या 'केसरी'ला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा अक्षयचा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी अक्षयच्या गोल्ड चित्रपटाने पहिल्या दिवशी २५.२५ कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत रणवीरच्या गली बॉय, अजय देवगणच्या टोटल धमाल आणि कॅप्टन मार्वल यांनाही मागे टाकले आहे.
सारागढीच्या युद्धात २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैन्यासोबत लढा देत शौर्याचा अभूतपूर्व नमुना दाखवून दिला होता. याच घटनेवर आधारित 'केसरी' चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात परिणीती चोप्राने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. तर अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.