बेंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार करणऱ्या डॉक्टरांच्या टीमला यश मिळू शकले नाही आणि त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. ही बातमी मिळताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली आहे.
अभिनेता पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात केएफआय स्टार शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1986 मध्ये बेट्टाड हूवू या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
1980 च्या दशकात बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर पुनीत राजकुमारने अप्पू या चित्रपटातून मुख्य भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तो प्रचंड हिट चित्रपट होता. आकाश (2005), आरासु (2007), मिलान (2007) आणि वंशी (2008) यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो ओळखला जातो जे त्याचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक यश आहेत.
2007 मध्ये आरसू मधील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि 2008 मध्ये मिलानमधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.