मुंबई- सध्या मराठी, हिंदी मध्ये बरेच शिवकालीन चित्रपट बनत आहेत. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेले यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरांचे 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प अर्पण करण्यास सिद्ध आहे. हे चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 'जंगजौहर' हे या चित्रपटाचे शीर्षक बदलून आता 'पावनखिंड' करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय
पावनखिंड हा शब्द जरी ऐकला की बाजीप्रभू देशपांडे यांच्या दाणपट्ट्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पावनखिंडीतील शौर्यगाथा आणि तिथल्या थराराची गाथा इतिहासाच्या पानापानांमध्ये आपण वाचली, ऐकली आहे. पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर रोमांच उभे करणारा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय आहे. शालेय जीवनापासूनच आपण इतिहासाच्या पुस्तकात पावनखिंडीतील बाजीप्रभूंनी गाजवलेल्या पराक्रमाचे धडे वाचलेले आहेत.
बाजीप्रभूंचा पराक्रम रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर'ची मुहूर्तापासून कायम चर्चा आणि उत्सुकता होती. या चित्रपटाच्या निमित्ताने बाजीप्रभूंचा पराक्रम रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासंदर्भातील एक बदल म्हणजे तो आता ‘पावनखिंड’ म्हणून ओळखला जाणार आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरली होती. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झालेली ही खिंड पुढे ‘पावनखिंड’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे ‘पावनखिंड’ हा शब्द आपल्याला अधिक जवळचा वाटतो. 'ते फकस्त ६०० व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे.
'पावनखिंड' शीर्षक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप
'जंगजौहर'पेक्षा 'पावनखिंड' हे शीर्षक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप आणि पूरक वाटल्याने दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी जणू शिवरायांचा प्रसाद मानून हे शीर्षक आपल्या चित्रपटाला बहाल केले आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे दिग्पालच्या व्हिजनमधून पडद्यावर अवतरणारी 'पावनखिंड'ची शौर्यगाथा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवेल असा विश्वास आहे. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेने छायांकन केले असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजीने दिले आहे.