मुंबई - मराठी रंगभूमीवर गाजलेलं, सिद्धार्थ जाधवला अभिनेता म्हणून वेगळी ओळख दिलेलं जागो मोहन प्यारे हे नाटक आता चित्रपटाच्या रुपानं प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रियदर्शन जाधव लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट अमेय विनोद खोपकर प्रस्तुत करत आहेत.
या चित्रपटात मूळ नाटकात मोहनची भूमिका केलेल्या सिद्धार्थ जाधवसह अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
स्वरुप रिक्रिएशन अँड मीडिया, लोकीज स्टुडिओ आणि अमेय विनोद खोपकर प्रस्तुत या चित्रपटाचे स्वाती अमेय खोपकर, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, सचिन मारुती लोखंडे, अतुल जनार्दन तारकर, विक्रम बरवाल हे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल सहनिर्माते आहेत. जागो मोहन प्यारे हे नाटक रंगभूमीवर तर चांगलंच गाजलं पण आता सिनेमा म्हणून त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.