भारतामध्ये दोनच गोष्टी बघायला लोक गर्दी करतात. पहिली सिनेमा आणि दुसरी क्रिकेट मॅच. या दोन्ही क्षेत्रातील सहभागी कलाकार वा खेळाडूंना सेलेब्रिटी दर्जा मिळतो. क्रिकेट मधील सेलिब्रिटीज मनोरंजन क्षेत्रात वावरताना दिसतात तसेच फिल्मी कलाकार क्रिकेटच्या स्टेडियममध्ये. परंतु जर सिनेकलाकार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरले तर प्रेक्षकांसाठी तो दुग्धशर्करा योग्य असेल. क्रिकेटमधील ‘आयपीएल’ प्रचंड प्रसिद्ध असून त्याच धर्तीवर एक मराठी सेलिब्रिटी क्रिकेट टूर्नामेंट भरविली जातेय. या ‘पुनीत बालन सेलेब्रिटी लीग’ मध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक छोटी-मोठी नावं क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत.
युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या पुनीत बालन सेलेब्रिटी लीग (पीबीसीएल) चा सीझन १ लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खेळाडूंचा लिलाव दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी भारताचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण याच्या हस्ते ‘पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
आपल्याकडे क्रिकेट हा ‘धर्म’ म्हणून ओळखला जातो इतका तो लोकांच्या हृदयाजवळ आहे. एखाद्या राजकीय विषयावर जसं प्रत्येकाला काही तरी मत मांडायचे असते तसेच क्रिकेट आणि चित्रपटांच्या बाबतीतही आहे. आता क्रिकेट आणि चित्रपट कलाकार या विषयांवर एकत्रित भाष्य होईल, चर्चा झडतील कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आपले लाडके कलाकार क्रिकेटच्या रणांगणात ‘पीबीसीएल’ अर्थात पुनीत बालन सेलेब्रिटी लीगच्या ट्रॉफीसाठी झुंजणार आहे. कलाकार-खेळाडूंच्या लिलावाप्रसंगी पुनीत बालन, शोभा आर. धारिवाल, जान्हवी आर. धारिवाल, संगीतकार अजय–अतुल, विनोद सातव यांच्यासह सर्व टीमचे कॅप्टन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी तर लिलाव प्राक्रियेचे सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केले.
मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार क्रिकेटच्या रणांगणात उतरणार असून ‘पीबीसीएल’ कॅप्टन्स आणि टीम पुढीलप्रमाणे आहेत.
- १. महेश मांजरेकर - पन्हाळा पॅंथर्स
- २. नागराज मंजुळे - तोरणा टायगर्स
- ३. प्रविण तरडे - रायगड रॉयल्स
- ४. सिद्धार्थ जाधव - सिंहगड स्ट्रायकर्स
- ५. शरद केळकर - प्रतापगड वॉरिअर्स
- ६. सुबोध भावे - शिवनेरी लायन्स
याप्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ‘पीबीसीएल’ गेल्यावर्षी घेण्याचे आमचे ठरले होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टी या महामारीच्या धक्क्यातून सावरत आहे, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘पीबीसीएल’च्या निमित्ताने मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असतील, टी १० चा फॉरमॅट असेल. ‘पीबीसीएल’चा यंदा पहिला सीझन असून या स्पर्धेत दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.
भारताचा तडाखेबाज खेळाडू युसुफ पठाण याच्या हस्ते पीबीसीएलच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना युसुफ पठाण म्हणाला, ‘क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मैदानाबाहेर आज तुम्ही दाखवलेल्या या प्रेमामुळे समजले की आपण आयुष्यात काहीतरी कमावले आहे. आमच्या चाहत्यांनी आमच्यावर केलेले प्रेम हीच आमची संपत्ती आहे. माझी मराठी भाषा थोडी कच्ची असली तरी संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.’
या कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी युसुफ पठाण याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ‘पीबीसीएल’च्या कार्यक्रमात यानिमित्ताने त्याला स्टँडिंग ओवेशन देण्यात आले, चाहत्यांच्या या प्रेमामुळे युसुफ पठाण चांगलाच भारावला होता.