मुंबई - 'कलर्स मराठी'वरील 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रम सुर झाल्यापासून सुरवीर सादर करत असलेली गाणी प्रेक्षकांच्या विशेष पंसतीस पडत आहेत. मागच्या पर्वात लाडका मॉनिटर असलेला हर्षद नायबळ याची धमाल मस्ती सेटवर पाहायला मिळाली होती. त्यामुळे यावेळीही त्याची धमाल पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती. आता लवकरच 'बालदिन' येत आहे. त्यामुळे 'सूर नवा..'चा आगामी भाग हा 'बालदिन विशेष' असणार आहे. या 'बालदिन विशेष' भागानिमित्त मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ पुन्हा एकदा सूर नवाच्या मंचावर येणार आहे
मॉनिटर हर्षद नायबळ सोबतच अंशिका, चैतन्य, सई, हे छोटे सुरवीर देखील येणार आहेत. यानिमित्ताने मंचावर थोडी मस्ती, थोडी कल्ला पुन्हा होणार आहे. स्पृहा आणि मॉनिटरची धम्माल मस्तीदेखील पाहायला मिळेल.
बालदिन विशेष भागात हर्षद त्याच्या शाळेतील गमतीजमती देखील सांगणार आहे. तसेच 'बम बम बोले' या गाण्यावर त्याचा डान्सही पाहायला मिळेल. कार्यक्रमाचे परिक्षक महेश काळे आणि अवधूत गुप्ते हे देखील त्यांच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा देणार आहेत. त्यामुळे 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावरचा हा बालदिन फारच वेगळा असेल, हे अजिबात सांगायला नको.